
आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार नेत्रदोष कोणत्या असंतुलनामुळे झाला आहे, हे लक्षात घेऊन उपचारांचे स्वरूप व कालावधी त्या अनुषंगाने बदलला जातो. .......
डोळे म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय. जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी सर्वच इंद्रिये संपन्न असायला हवीत हे खरे असले तरी त्यातल्या त्यात डोळे अग्रणी ठरावेत. अष्टांगसंग्रहात डोळ्यांचे महत्त्व अशा प्रकारे सांगितले आहे,
चक्षुरक्षायां सर्वकालं मनुष्यैःयत्नः कर्तव्यो जीविते यावदिच्छा ।व्यर्थो लोको।य़ं तुल्यरात्रिनिन्दवानांपुंसामन्धानां विद्यमाने।पि वित्ते ।।
... अष्टांगसंग्रह उत्तरस्थान
जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मनुष्याने डोळ्यांच्या रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अंध व्यक्तीजवळ धन-संपत्ती असली तरी त्याच्यासाठी दिवस व रात्र एकच असल्याने सर्वच व्यर्थ होते.
डोळे अतिशय संवेदनशील तसेच नाजूक असतात. बाह्य वातावरण, शरीरातील दोष-धातूंची स्थिती एवढेच नाही तर मानसिक अवस्थेचाही डोळ्यांवर चांगला-वाईट परिणाम होत असतो. दृष्टी म्हणजेच दिसण्याची क्रिया योग्य असण्यासाठी दर्शनग्रहण करणारे चक्षुरेंद्रिय तर चांगले हवेच पण ते ज्या आधारे राहते ते डोळेरूपी अवयवही उत्तम असायला हवेत.
चष्मा लागतो म्हणजेच दृष्टी किंवा नजर कमकुवत होते. यामागे अनेक बिघाड असू शकतात. या बिघाडांची अनेक कारणे असू शकतात. सगळेच बिघाड झटपट दूर होतील असे नाही पण आयुर्वेदशास्त्रात नेत्ररोगाची कारणे, प्रकार व उपचार यांची सविस्तर माहिती दिलेली आढळते.
सुश्रुतसंहितेमध्ये ७६ प्रकारचे नेत्ररोग वर्णन केलेले आहेत, तर वाग्भटाचार्यांच्या मते ९४ प्रकारचे नेत्ररोग आहेत. नेत्रदोषाचे निदान करताना तो वातदोषातील बिघाडामुळे झाला आहे का पित्तदोषातील असंतुलनामुळे झाला आहे का कफदोष अति प्रमाणात वाढल्यामुळे झाला आहे हे मुख्यत्वाने पहावे लागते, तसेच रक्तात बिघाड झाल्याने, शरीरधातूंची ताकद कमी झाल्याने दृष्टी खालावते आहे का होही पाहावे लागते. अर्थातच उपचारांचे स्वरूप व उपचारांचा कालावधी त्या अनुषंगाने बदलत जातो.