मैत्री आणि विश्वासाचे नाते…

Uncategorized

घटनेनंतर ठाणे महापालिका अलर्ट

मुंबईतील दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका अलर्ट; २.४८ लाख मॅनहोलची तपासणी, १३५१ झाकणे बदलली

ठाणे : मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर ठाणे महापालिका सतर्क झाली आहे. शहरात अशाप्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेने संपूर्ण शहरातील मॅनहोलची तपासणी मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत १३५१ मॅनहोलची तुटलेली झाकणे आणि जाळ्या बदलण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत एकूण २ लाख ४८ हजार १३६ मॅनहोल आहेत. मुंबईतील दुर्घटनेनंतर या सर्व मॅनहोलची टप्प्याटप्प्याने तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी झाकणे किंवा जाळ्या तुटलेल्या, नादुरुस्त अथवा गायब असल्याचे आढळून येत आहे, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील सर्व प्रभाग समित्यांमार्फत अभियंत्यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. मॅनहोलची संख्या मोठी असल्याने प्रत्येक प्रभागात स्वतंत्रपणे तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. आतापर्यंत १३५१ मॅनहोलची झाकणे आणि जाळ्या बदलण्यात आल्या असून उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
भर पावसातही महापालिकेने ही मोहीम सुरू ठेवल्याने अनेक ठाणेकरांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्यात उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल नागरिकांसाठी मोठा धोका ठरू शकतात. त्यामुळे ही प्रतिबंधात्मक कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी झाडे कोसळून जीवितहानी तसेच वाहनांचे नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नागरिकांकडून तक्रारी करूनही धोकादायक झाडांची छाटणी वेळेत होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे ज्या तत्परतेने मॅनहोलची तपासणी आणि दुरुस्ती केली जात आहे, त्याच गांभीर्याने धोकादायक झाडे व फांद्यांची छाटणी करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ठाणेकरांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *