मान्सूनचा मुक्काम लांबणार; महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
मान्सूनचा मुक्काम लांबणार; महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई : सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वसाधारणपणे 17 सप्टेंबरपर्यंत देशातील बहुतांश भागांतून मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात होते. यंदाही मान्सून नियोजित वेळेत परतेल, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, बदलत्या हवामान परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांत मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेशात काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
12 आणि 13 सप्टेंबरला पावसाचा जोर वाढणार
गेल्या आठवड्यात देशातील अनेक भागांत पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. काही ठिकाणी काही तास किंवा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
14 सप्टेंबरला पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, 15 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
11 सप्टेंबर : या जिल्ह्यांना यलो अलर्ट
नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
12 सप्टेंबर : अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता
धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
13 सप्टेंबर : मुंबईसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
14 सप्टेंबर : पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट
नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषतः वीजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा पाण्याच्या ठिकाणी थांबणे टाळावे.
एकंदरीत, सप्टेंबरच्या मध्यावरही मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांना आगामी काही दिवस पावसाचा सामना करावा लागू शकतो.
