सण पारंपरिक पद्धतीनेच साजरे करा -राज ठाकरे
ठाणे: “सण आणि उत्सव हे बेभान होऊन किंवा धर्मांधतेतून साजरे करण्याचे माध्यम नाहीत. डीजेच्या दणदणाटाने सणांचे स्वरूप बिघडवले जात असून आपण उत्तरेतील चुकीच्या संस्कृतीचे अनुकरण करत आहोत,” सण पारंपरिक पद्धतीनेच साजरे करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात केले राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये आयोजित मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी डीजेबंदी, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि महापुरुषांचा सन्मान यांसारख्या विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
डीजे संस्कृतीवर ताशेरे
गणेशोत्सवातील डीजेच्या वापराबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले, “इतक्या श्रद्धेने गणपती घरी आणायचा आणि विसर्जनाच्या वेळी डीजेच्या तालावर नाचायचे, यात कसला आनंद साजरा होतोय? विसर्जनाच्या वेळी घर आणि मन ओकंबोकं होतं, मग तिथे डीजेचा दणदणाट कशासाठी? या आवाजामुळे लोकांचे कान आणि डोळे खराब होत आहेत, तर हृदयविकार असलेल्यांना प्राण गमवावे लागत आहेत.” नागपुरात डीजे बंद होऊ शकतो, मग संपूर्ण महाराष्ट्रात का नाही, असा सवाल करत सण पारंपरिक मराठी पद्धतीनेच साजरे झाले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. “देशात आज बेरोजगारी, महागाई आणि शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. या मूळ प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्मांधता आणि जातीयवाद पसरवला जात आहे. आगामी गणेशोत्सवाच्या काळात राज्यात दंगली घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो,” अशी भीती व्यक्त करत सर्व सुजाण हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
महापुरुषांच्या सन्मानाबाबत स्पष्ट भूमिका
शासकीय कार्यालये आणि कार्यक्रमांमधील फोटोंच्या वादावर बोलताना, “छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत किंवा पंक्तीत दुसरं कोणीही बसू शकत नाही,” असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी मांडले.
गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही चिथावणीला बळी न पडता कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी संयम बाळगून महाराष्ट्राची परंपरा जपावी, असा सल्ला देत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

