रत्नागिरीत रोजगाराचे नवे पर्व! दोन पंचतारांकित हॉटेल्समुळे ६०० ते ७०० तरुणांना मिळणार थेट संधी
रत्नागिरी: जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, रत्नागिरी शहरात उभारण्यात येत असलेल्या ‘महिंद्रा क्लब’ आणि ‘एक्सप्रेस इन’ या दोन पंचतारांकित हॉटेल्सच्या माध्यमातून सुमारे ६०० ते ७०० स्थानिक तरुणांना रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महिला बचत गटांची आर्थिक पिळवणूक रोखणे, ‘सिंधुरत्न समृद्ध योजने’ला गती देणे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या अफवांना पूर्णविराम देणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले.
स्थानिक तरुणांना प्रशिक्षणातून थेट नोकरी
रत्नागिरीतील ‘महिंद्रा क्लब’चे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, हे हॉटेल आणि ‘एक्सप्रेस इन’ लवकरच सेवेत दाखल होत आहे. वेटर, शेफ, हाऊसकीपिंग, ड्रायव्हर आणि मॅनेजर अशा विविध पदांसाठी ६०० ते ७०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. भूमिपुत्रांना या संधीचा लाभ मिळावा, यासाठी रत्नागिरीतील ‘स्किल सेंटर’शी दोन्ही हॉटेल्सचा सामंजस्य करार करून तरुणांना योग्य प्रशिक्षण देऊन थेट नोकरीत सामावून घ्यावे, असे स्पष्ट निर्देश डॉ. सामंत यांनी दिले आहेत.
मायक्रो फायनान्सच्या मनमानीला बसणार चाप
महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारा त्रास आणि सक्तीच्या वसुलीबाबत पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यावर विशेष बैठक बोलावण्यात आली असून, राष्ट्रीयीकृत बँकांनी बचत गटांना कर्ज नाकारू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
सिंधुरत्न योजनेला गती आणि भाट्येमध्ये बोट टर्मिनल
सिंधुरत्न समृद्ध योजनेतील कामांचा आढावा घेऊन २०२५-२६ चे प्रस्ताव परिपूर्ण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. महिला बचत गटांना दिलेल्या गाड्यांचा उपक्रम यशस्वी ठरला असून, पर्यटनाला चालना देण्यासाठी भाट्ये येथे आधुनिक बोट टर्मिनल उभारण्यात येणार आहे.
शाळा बंद होणार नाहीत – पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण
जिल्हा परिषदेच्या १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे निराधार असून, असा कोणताही निर्णय झालेला नाही, असा ठाम खुलासा पालकमंत्र्यांनी केला आहे. तसेच शाळांचे ‘क्लस्टर’ तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत.

