“रुग्णांना दवाखान्यात जाण्याची गरज नाही, डॉक्टरच येणार तुमच्या दारी!” पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा धडाक्यात शुभारंभ !
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि दुर्गमता लक्षात घेता, ग्रामीण व दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने स्वतः लोकांच्या घरापर्यंत पोहोचून वैद्यकीय सेवा देण्याला प्राधान्य द्यावे, असे ठाम प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १५) करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
गावागावात पोहोचणार ३८ आरोग्य केंद्रे
या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून थेट गावागावात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. “नागरिकांनी आरोग्यसेवेसाठी सरकारी यंत्रणेकडे चकरा मारण्याऐवजी, यंत्रणेने स्वतःहून जनतेच्या दारापर्यंत पोहोचणे ही कौतुकास्पद बाब आहे,” असे सांगत या उपक्रमाचे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही कौतुक केले असून, हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा सरकारचा विचार असल्याचे नितेश राणे यांनी नमूद केले.
जिल्ह्यातच मिळणार दर्जेदार उपचार
“सिंधुदुर्गातील कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी मुंबई, गोवा किंवा इतर जिल्ह्यात जाण्याची वेळ येऊ नये, हाच आमचा मुख्य उद्देश आहे,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुर्गम भागात डॉक्टरांची उपलब्धता वाढवणे, मोबाईल आरोग्य युनिट्स सुरू करणे आणि आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विविध सरकारी योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, तहसीलदार, आरोग्य अधिकारी आणि स्थानिक सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी विविध आरोग्य योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले.

