मैत्री आणि विश्वासाचे नाते…

सिंधुदुर्ग

मालवणी भाषेला मिळणार जागतिक ओळख! सिंधुदुर्गात उभारणार स्वतंत्र संशोधन केंद्र; शब्दकोशही तयार होणार

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; मालवणी भाषा, साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

सिंधुदुर्ग : कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा अभिमान असलेल्या मालवणी भाषेला आता जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मालवणी भाषा, साहित्य, लोककला आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र ‘मालवणी संशोधन केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्रा’च्या माध्यमातून हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.
या केंद्राच्या माध्यमातून मालवणी भाषेचे शास्त्रीय संशोधन, शब्दसंपदेचे संकलन, दस्तऐवजीकरण आणि व्यापक प्रसार केला जाणार आहे. विशेष म्हणजे मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोशही तयार करण्यात येणार असल्याने या बोलीभाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, एमआयडीसीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मालवणी भाषेच्या समृद्ध वारशाला मिळणार संशोधनाची जोड
मालवणी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून सिंधुदुर्गच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. या भाषेत असलेली वैशिष्ट्यपूर्ण शब्दसंपदा, म्हणी, वाक्प्रचार, लोकसाहित्य, बोलीतील विविधता आणि पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या भाषिक परंपरा यांचे शास्त्रीय पद्धतीने संकलन व जतन करण्यासाठी या संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
मालवणी भाषेचा अभ्यास अधिक व्यापक स्वरूपात व्हावा, संशोधकांना अभ्यासासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि या भाषेची ओळख देश-विदेशातील भाषाभ्यासकांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. या संशोधन केंद्राची मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली होती.
मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार होणार
मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील विविध बोलीभाषांचे स्वतंत्र शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत मालवणी भाषेचाही स्वतंत्र शब्दकोश तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
या शब्दकोशात मालवणी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्द, त्यांचे अर्थ, म्हणी, वाक्प्रचार आणि भाषिक वैशिष्ट्यांचे संकलन केले जाणार आहे. त्यामुळे मालवणी भाषेतील मौखिक परंपरेला लिखित स्वरूप मिळण्यास मदत होईल. नव्या पिढीला आपल्या मातृबोलीतील शब्दवैभव समजून घेता येईल, तसेच भाषा अभ्यासक आणि संशोधकांसाठीही हा शब्दकोश महत्त्वाचा संदर्भ ठरू शकतो.
दशावतारासह लोककलांना मिळणार नवे व्यासपीठ
मालवणी भाषेच्या संवर्धनासोबतच सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या दशावतार लोककलेच्या जतन आणि संवर्धनालाही या केंद्राच्या माध्यमातून चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दशावतार, पारंपरिक लोककला, लोकसाहित्य, सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक कलाकारांचे योगदान यांचे दस्तऐवजीकरण करण्याची संधी या उपक्रमातून निर्माण होणार आहे. स्थानिक कलाकार, लोककला अभ्यासक आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरू शकते.
मालवणी भाषा, तिचे शब्दवैभव, लोकपरंपरा आणि दशावतारासारख्या समृद्ध लोककलांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे संशोधन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवाला नवी दिशा देणारा हा उपक्रम मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *