नवी मुंबईत ‘हिरकणी महोत्सवा’ची धूम! २७५ हून अधिक स्टॉल्सवर दिवाळी खरेदीसाठी महिलांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ
नवी मुंबई : महिला बचत गट आणि स्थानिक संस्थांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ‘हिरकणी महोत्सवा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नवी मुंबईकरांनी या महोत्सवाला पसंती दिली असून, तब्बल २७५ हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून महिलांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
सेक्टर २६, करावे-नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानावर १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महापौर सुजाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार आणि समितीच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
वर्षातून किमान तीनदा प्रदर्शन भरवा; गणेश नाईक यांची सूचना
हिरकणी महोत्सवाची संकल्पना कौतुकास्पद असल्याचे सांगत वनमंत्री गणेश नाईक यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन वर्षातून किमान तीन वेळा, शहरातील विविध भागांत सात-सात दिवसांसाठी करण्यात यावे, अशी सूचना केली. महिलांच्या कौशल्याला आणि मेहनतीला योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा भक्कम आधार मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
१५० स्टॉल्सची तयारी; प्रतिसादामुळे संख्या २७५ वर
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार यांनी सांगितले की, सुरुवातीला १५० स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, महिला बचत गट आणि संस्थांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता स्टॉल्सची संख्या वाढवून २७५ करण्यात आली. या महोत्सवात महिलांनी तयार केलेले दिवाळी साहित्य, विविध प्रकारचे कपडे, ड्रेस मटेरियल, साड्या, दागिने आणि गृहसजावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय रुचकर खाद्यपदार्थांचे २१ स्टॉल्सही नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहेत.
दिवाळीच्या खरेदीसाठी एकाच छताखाली विविध वस्तू
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महोत्सवात आकर्षक पणत्या, आकाशकंदील, सुगंधी उटणे, रांगोळ्या, हस्तकला साहित्य, गृहसजावटीच्या वस्तू तसेच घरगुती पद्धतीने तयार केलेला लाडू, करंजी, चकली, शेव यांसारखा फराळ विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
विशेषतः साड्या, कपडे आणि ड्रेस मटेरियलच्या विविध आकर्षक प्रकारांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. रास्त दरात दर्जेदार वस्तू उपलब्ध होत असल्याने नागरिकांकडून खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनाही व्यासपीठ
या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी दिव्यांग शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी तयार केलेल्या वस्तूंचा विशेष स्टॉल येथे उभारण्यात आला आहे. त्यामुळे महिला बचत गटांसोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कौशल्यालाही बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
महिला उद्योजिकांशी संवाद; वनमंत्र्यांकडून वस्तूंची खरेदी
वनमंत्री गणेश नाईक आणि महापौर सुजाता पाटील यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन महिला विक्रेत्या आणि उद्योजिकांशी संवाद साधला. त्यांच्या उत्पादनांची माहिती घेत महिलांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. वनमंत्र्यांनी काही वस्तूंची किंमत अदा करून खरेदी करत महिला उद्योजिकांचा उत्साह वाढविला.
यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी प्रदर्शनाला महिलांनी दिलेला प्रतिसाद समाधानकारक असल्याचे सांगितले. महिलांना स्वतःचे कौशल्य दाखविण्याची संधी आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा उद्देश या महोत्सवातून साध्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना गरजू नागरिकांच्या मदतीसाठी महोत्सवाच्या ठिकाणी मदतनिधी संकलनाचा बॉक्स ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी स्वेच्छेने यथाशक्ती मदत करावी. संकलित निधी मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त मदतनिधीसाठी देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी
चार दिवसांच्या या महोत्सवात खरेदीसोबतच विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचीही रेलचेल आहे. दीप संध्या आणि गंगा आरती, महिलांचे गायन, वादन, नृत्य आणि मंगळागौर तसेच महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा – होम मिनिस्टर’ या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पारितोषिक वितरण सोहळ्याने महोत्सवाची सांगता होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, महापौर सुजाता पाटील, सभागृह नेते सागर नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार, उपसभापती रूपाली भगत यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, नगरसेवक, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या कष्टातून आणि कल्पकतेतून निर्माण झालेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारा हा महोत्सव महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे १ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नवी मुंबईकरांनी कुटुंबीयांसह महोत्सवाला भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार आणि उपसभापती रूपाली भगत यांनी केले आहे.

