ठाण्यात थरार! गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला
कर्तव्य बजावताना पीएसआय किसन भोईर यांचा मृत्यू
ठाणे: गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी गस्तीवर तैनात असलेले चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) किसन भोईर (वय ५६) यांची एका सराईत गुन्हेगाराने निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पीएसआय किसन भोईर हे आपल्या सहकाऱ्यांसोबत ‘पीसीआर-१’ व्हॅनने पोखरण रोड क्रमांक २, गांधीनगर आणि सुभाषनगर परिसरात गणपती बंदोबस्ताअंतर्गत रात्रीच्या गस्तीवर होते. ते पूर्ण पोलीस गणवेशात आपले कर्तव्य बजावत असताना, पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राजू वाल्मीकी (वय ३०) याने दारूच्या नशेत त्यांच्यावर पाठीमागून अचानक हल्ला चढवला.
आरोपी राजू याने बांबू आणि दगडाने पीएसआय भोईर यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केले. या भयंकर हल्ल्यात भोईर हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि गंभीर जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलीस दलात हळहळ, तपासाला वेग
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरूडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी आरोपी राजू वाल्मीकी याच्याविरोधात हत्येचा (खुनाचा) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस या हल्ल्यामागील नेमके कारण शोधत आहेत.

