नवी मुंबईकरांनो, फटाके वाजवण्याची वेळ ठरली! रात्री १० नंतर बंदी; प्रदूषणाच्या तक्रारींसाठी महापालिकेचे हेल्पलाईन क्रमांक जाहीर
नवी मुंबई : दिवाळीचा सण आनंदात साजरा करताना ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार फटाके वाजवण्यासाठी रात्री ७ ते १० हीच वेळ निश्चित करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे, ध्वनी आणि पर्यावरणीय प्रदूषणासंदर्भात नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी महापालिकेने आठ विभागांचे स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल आयडी जाहीर केले आहेत. तसेच दोन टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत.
फटाक्यांच्या आवाजावर मर्यादा; बंदी असलेल्या फटाक्यांची विक्रीही बेकायदेशीर
भारत सरकारच्या ५ ऑक्टोबर १९९९ रोजीच्या अधिसूचनेनुसार १२५ डेसिबल (AI) पेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथियम, आर्सेनिक, शिसे (लेड) आणि पारा (मर्क्युरी) यांसारखे घातक घटक असलेल्या फटाक्यांच्या वापरावरही बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होऊन मानव, प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य दिवसांमध्ये सरासरी ९१ असणारा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) दिवाळीदरम्यान फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे सरासरी २१२ पर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वाढते.
फटाके विक्रेत्यांनाही नियमांचे पालन बंधनकारक
जनहित याचिका क्रमांक १५२/२०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक अधिनियम १८८४ आणि त्याअंतर्गत विस्फोटक नियम २००८ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री करता येणार नाही. तसेच परवानगी असलेल्या फटाक्यांची विक्री महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी आवश्यक परवानगी घेऊनच करावी लागणार आहे.
फटाके वाजवण्यासाठी रात्री ७ ते १० हीच वेळ
राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या ३ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशासह मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिका क्रमांक ३/२०२३ मधील निर्देशांनुसार नागरिकांना केवळ संध्याकाळी ७ ते रात्री १० या कालावधीतच फटाके वाजवता येणार आहेत.
शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत जनजागृती करावी. पोलीस प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, तर महापालिकेच्या संबंधित विभागीय सहाय्यक आयुक्तांनीही नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन
मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या Suo Motu PIL No. 01 of 2026 या प्रकरणात १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणीय प्रदूषणाबाबत नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस विभागांना स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक तसेच प्रभागनिहाय ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर खालील संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी जाहीर केले आहेत.
बेलापूर ८९७६९५४८८१ amc_belapur_ward@nmmc.gov.in
नेरुळ ८९७६९५४८८२ amc_nerul_ward@nmmc.gov.in
वाशी ८९७६९५४८८४ amc_vashi_ward@nmmc.gov.in
तुर्भे ८९७६९५४८८३ amc_turbhe_ward@nmmc.gov.in
कोपरखैरणे ८९७६९५४८८५ amc_koperkhairne_ward@nmmc.gov.in
घणसोली ८९७६९५४८८६ amc_ghansoli_ward@nmmc.gov.in
ऐरोली ८९७६९५४८८७ amc_airoli_ward@nmmc.gov.in
दिघा ८९७६९५४८८९ amc_digha_ward@nmmc.gov.in
टोल फ्री क्रमांक : १८००२२२३०९, १८००२२२३१०
नागरिकांनी आपल्या विभागातील ध्वनी प्रदूषण किंवा पर्यावरणीय प्रदूषणासंदर्भातील तक्रारी वरील संपर्क क्रमांकांवर किंवा संबंधित ई-मेल आयडीवर नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरित दिवाळी साजरी करण्याचे महापालिकेचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’, ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण’ अभियानांतर्गत फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी मातीच्या पणत्या लावाव्यात, प्लास्टिकचा वापर टाळून कागदी किंवा कापडी आकाशकंदील वापरावेत, फटाक्यांचा वापर टाळावा, प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. तसेच झाडांवर विद्युत रोषणाई करू नये आणि सण-समारंभांमध्ये पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंना प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबईकरांनी पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून दिवाळीचा सण आनंदी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करावा, अशा शुभेच्छाही महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

