ठाण्यातील तीन एसटी स्थानकांची अचानक झाडाझडती : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा रुद्रावतार
ठाणे : ठाणे शहरातील एसटी बसस्थानकांवरील अस्वच्छता आणि प्रवाशांची होणारी गैरसोय पाहून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी चांगलेच संतापले. ठाणे स्टेशन, वंदना आणि खोपट या तीन प्रमुख एसटी बसस्थानकांची अचानक पाहणी करत मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना धारेवर धरले. “स्वच्छतेच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दमच त्यांनी यावेळी दिला.
ठाणे महापालिकेच्या नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या सभापती मिनल संख्ये यांनी बसस्थानकांवरील अस्वच्छतेबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत मंत्री सरनाईक यांनी शनिवारी थेट ग्राउंडवर उतरून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका मिनल संख्ये, नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे आणि संजय वाघुले उपस्थित होते.
अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील एसटी बसस्थानकावरील प्रसाधनगृहांची दुरवस्था पाहून सरनाईक यांचा पारा चढला. “बसस्थानकावरील प्रसाधनगृह हे अस्वच्छतेचे आगार बनले आहे का?” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. संबंधित ठेकेदाराकडून तातडीने स्वच्छता करून घेण्याची तंबी त्यांनी दिली. तसेच, स्थानक परिसरात पाडकाम झालेल्या ठिकाणचे बांधकाम साहित्य त्वरित हटवून नवीन बसस्थानकाचे काम कोणताही विलंब न करता पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
कर्मचाऱ्यांची भावनिक साद आणि मंत्र्यांची सकारात्मक दखल
पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी खोपट बसस्थानकावरील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाला भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका कर्मचाऱ्याने मनातील भावना व्यक्त करताना म्हटले की, “साहेब, तुम्ही आल्यानंतर सगळं ठीक होतं. असेच दौरे महाराष्ट्रभर करा, जेणेकरून आम्हा कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळतील आणि आम्ही अधिक जोमाने काम करू.”
कर्मचाऱ्याच्या या प्रतिक्रियेची मंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक दखल घेतली. खोपट बसस्थानकावरील सुविधांबाबत समाधान व्यक्त करताना “एसटी कर्मचारी हा महामंडळाचा कणा आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. खोपटप्रमाणेच स्वच्छ आणि नीटनेटकी बसस्थानके राज्यभरात उभी राहिली पाहिजेत.” असे ते म्हणाले.

