उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘यूके’च्या कंपन्यांना थेट आवाहन
मुंबई : कौशल्य, भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातील सर्वात उत्कृष्ट राज्य आहे. सर्वच क्षेत्रांतील उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्थेच्या (Ecosystem) निर्मितीत महाराष्ट्र आज सर्वात आघाडीवर आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची ताकद जागतिक व्यासपीठावर अधोरेखित केली.
मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित ‘महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ’ (Maharashtra-UK Partnership) कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युनायटेड किंगडममधील (UK) नामवंत संस्था आणि बड्या उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे जाहीर आवाहन केले.
‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ च्या माध्यमातून प्रकल्पांना मिळणार सुपरफास्ट गती!
गुंतवणूकदारांचे प्रकल्प लालफितीच्या कारभारात न अडकता वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ (Invest Maharashtra) या विशेष व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यूकेच्या या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा दौरा केवळ औपचारिक भेट नसून, दोन्ही देशांमधील महत्त्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारांमध्ये रूपांतर करण्याचा हा ठोस प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारांचे (MoU) आदानप्रदान करण्यात आले.
मुंबई-पुण्याची ताकद आणि जागतिक विद्यापीठांचे महाराष्ट्रात आगमन!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याची माहिती देताना सांगितले की:
- मुंबई: आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योजकतेला थेट जागतिक बाजारपेठांशी जोडते.
- पुणे: अभियांत्रिकी (Engineering), वाहन उद्योग (Automobile), उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञानाचे (IT) जागतिक केंद्र बनले आहे.
- एज्युकेशन हब: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन’ यांसारखी जागतिक दर्जाची विद्यापीठे महाराष्ट्रात त्यांचे कॅम्पस सुरू करत आहेत.
- भविष्यातील शहरे: राज्यात लवकरच ‘एज्युसिटी’, ‘मेडिसिटी’ आणि ‘एआय इनोव्हेशन सिटी’ (AI Innovation City) उभारली जाणार असून, तिथे जागतिक दर्जाचे संशोधन केले जाईल.
याशिवाय, क्लीन एनर्जी (स्वच्छ ऊर्जा), कार्बन उत्सर्जन कमी करणे, जल व्यवस्थापन आणि वाहतूक क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली जाईल. जागतिक कंपन्यांना त्यांची ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ महाराष्ट्रात उभारण्यासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग आणि लघुउद्योजकांना (MSMEs) थेट ब्रिटनची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
“महाराष्ट्राची अर्थव्यवस्था नॉर्वे देशापेक्षाही मोठी!” – यूकेचे राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स
यूकेचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी महाराष्ट्राचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या ब्रिटीश कंपन्यांसाठी महाराष्ट्र हे सर्वात नैसर्गिक आणि योग्य ठिकाण आहे. महाराष्ट्राची निवड आम्ही येथील मजबूत आर्थिक ताकद, राजकीय स्थैर्य आणि उत्कृष्ट नेतृत्वामुळे केली आहे.”
विशेष म्हणजे, “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही युरोपमधील ‘नॉर्वे’ या समृद्ध देशापेक्षाही मोठी आहे,” असा गौरवपूर्ण उल्लेख रेनॉल्ड्स यांनी केला. आम्ही येथे केवळ कागदावर स्वाक्षरी करायला आलो नसून, प्रत्यक्ष काम करून दोन्ही देशांच्या प्रगतीला गती देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला उपस्थित प्रमुख मान्यवर:
या हाय-प्रोफाईल कार्यक्रमाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबळगण, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, यूकेमधील स्कॉटलंडचे पर्यावरण सचिव डेम अँज्युला ईगल, राज्य सचिव डग्लस अलेक्झांडर, पश्चिम भारतासाठी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग यांसह अनेक ब्रिटीश महापौर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

