Latest:

मैत्री आणि विश्वासाचे नाते…

नवी मुंबई

दिवाळी खरेदीची धूम! नवी मुंबईत रंगणार भव्य ‘हिरकणी महोत्सव’; महिलांच्या स्वावलंबनाला मिळणार नवी दिशा

नवी मुंबई : महिला सक्षमीकरणाला आणि त्यांच्या अंगभूत कलागुणांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे दिवाळीपूर्वी १ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भव्य ‘हिरकणी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. करावे (सेक्टर २६, नेरुळ) येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानात सकाळी ११.०० ते रात्री १०.०० या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या माध्यमातून आयोजित या महोत्सवाचा मुख्य उद्देश स्थानिक महिला बचत गट आणि महिला संस्थांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बाजारपेठ मिळवून देणे हा आहे.

भव्य उद्घाटन सोहळा
महोत्सवाचा शानदार शुभारंभ रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना. श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते आणि महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

चार दिवसीय रंगतदार कार्यक्रमांची रूपरेषा
या महोत्सवात केवळ खरेदीच नव्हे, तर नवी मुंबईकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी असणार आहे:
रविवार, १ नोव्हेंबर: सकाळी ११.०० वा. – भव्य उद्घाटन सोहळा | संध्याकाळी ७.०० वा. – डोळ्यांचे पारणे फेडणारी ‘दीप संध्या गंगा आरती’.
सोमवार, २ नोव्हेंबर: संध्याकाळी ६.०० वा. – महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी खुले व्यासपीठ (गायन, वादन, नृत्य आणि पारंपरिक मंगळागौर).
मंगळवार, ३ नोव्हेंबर: संध्याकाळी ६.०० वा. – महिलांचा लाडका खेळ ‘खेळ पैठणीचा – होम मिनिस्टर’.
बुधवार, ४ नोव्हेंबर: संध्याकाळी ६.०० वा. – महोत्सवाचा भव्य समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा.

नवी मुंबईकरांना आवाहन
‘स्त्री सक्षमीकरणाची ज्योत लावूया, प्रत्येक हाती स्वावलंबनाची पणती देऊया!’ या उदात्त संकल्पनेवर आधारित या महोत्सवाला नवी मुंबईकरांनी सहकुटुंब भेट द्यावी. स्थानिक महिलांच्या स्वावलंबनाला हातभार लावण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी करावी, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. सलुजा सुतार आणि उपसभापती श्रीम. रूपाली भगत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *