Latest:

मैत्री आणि विश्वासाचे नाते…

राज्य

नवी मुंबईत हवा प्रदूषण आणि पाणी टंचाई विरोधात महापालिका ॲक्शन मोडवर! आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

नवी मुंबई : एल निनोमुळे उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे हे आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले. विभागांच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांच्यासह सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

जलनियोजनावर विशेष भर
नागरिकांना पाणी टंचाईची कोणतीही अडचण भासणार नाही अशाप्रकारे जलनियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विभाग अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्थापन केलेल्या विशेष भरारी पथकांनी संपूर्ण क्षमतेने आणि प्रभावीपणे कामगिरी करावी, असे आयुक्तांनी बजावले.
पाणीपुरवठा विभागाने पुढील कालावधीसाठी जलनियोजनाचा सर्वसमावेशक आराखडा दोन दिवसांत तयार करावा.
बांधकाम क्षेत्रे, सर्व्हिस सेंटर्स, कार वॉशिंग सेंटर्स याठिकाणी केवळ प्रक्रिया केलेले (Recycled) पाणीच वापरले जाईल याकडे काटेकोर लक्ष द्यावे.
नागरिकांच्या पाणी विषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी मदतकार्य यंत्रणा अधिक सक्षम करावी.

हवा प्रदूषणाबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण
नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेने शून्य सहिष्णुता (Zero Tolerance) धोरण स्वीकारले आहे. सर्व बांधकाम साईट्सवर बारकाईने लक्ष ठेवून मानक नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्वरित कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व बांधकाम साईट्सवर सीसीटिव्ही (CCTV) कॅमेरे लावण्यात आले आहेत की नाही, याची खातरजमा करण्याचे आदेश.
महापालिकेच्या स्वतःच्या सुरू असलेल्या बांधकामांसाठीही हीच कठोर नियमावली लागू राहील.
सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर रोड या मुख्य रस्त्यांवर नियमित ‘डीप क्लिनींग मोहीम’ राबवून प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते स्वच्छ करावेत.
वर्दळीच्या चौकांमध्ये धूळ प्रतिबंधासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे कारंजे (Fountains) बसवावेत.

दिवाळीत फटाक्यांवर कडक निर्बंध; व्यापक जनजागृती
येत्या दिवाळी सणादरम्यान हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवाजी फटाक्यांवरील कडक निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. याबाबत फटाके विक्रेत्यांना लेखी कल्पना देण्यात येणार असून, नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी अग्निशमन विभागामार्फत विशेष मोहीम राबवली जाईल.

जनतक्रारींचे निवारण तत्परतेने करण्याचे आदेश
या महत्त्वपूर्ण बैठकीत आयुक्तांनी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत होणारी कार्यवाही, ग्रिव्हेन्स पोर्टल सिस्टीमवरील तक्रारी, विविध शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, तसेच आरोग्य व शिक्षण सुविधांचाही सविस्तर आढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचे तत्परतेने निराकरण करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अखेर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *