…तर त्या ठेकेदारांना थेट काळ्या यादीत टाकणार! रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांचा सक्त इशारा
रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही. अशा कामचुकार ठेकेदारांना भविष्यात थेट काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात येईल, असा कडक इशारा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे.
शासकीय विश्रामगृहात आयोजित जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनांच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. भविष्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
अडथळा आणणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करा!
बैठकीत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाने एकमेकांमध्ये समन्वय ठेवून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत. जलजीवन मिशनच्या कामांमध्ये जर स्थानिक नागरिक किंवा इतर कोणीही अडथळा निर्माण करत असेल, तर त्यांच्याविरुद्ध थेट पोलीस विभागाकडे तक्रार दाखल करा, अशा कडक सूचना डॉ. सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल दाभोळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आणि मतदारसंघातील ठेकेदार उपस्थित होते.
मच्छिमारांना मोठा दिलासा; २२ प्रस्तावांना मंजुरी, आता कृषी दराने मिळणार वीज!
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. ९ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, आता मच्छिमारांना कृषी क्षेत्राप्रमाणेच पायाभूत सुविधा आणि सवलती मिळणार आहेत.
या योजनेअंतर्गत (प्रक्रिया उद्योग वगळता) मच्छिमारांना कृषी दराने वीज पुरवठा करण्याची तरतूद आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून महावितरणकडे पाठवलेल्या ५६ प्रस्तावांपैकी २२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, या सर्वांना तातडीने कृषी दराने वीज पुरवठा सुरू करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. या बैठकीला सहाय्यक आयुक्त जीवन सावंत, बंड्या साळवी, सुदेश मयेकर आणि ॲड. समृद्धी मयेकर उपस्थित होते.
शामराव पेजे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार; पालकमंत्र्यांचे ‘ऑटो एक्सपो’साठी सहकार्याचे आश्वासन
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील स्टाफची कमतरता, प्रॅक्टिकल प्रशिक्षणाचा अभाव आणि लॅबमध्ये पुरेशी उपकरणे नसणे अशा गंभीर समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील, असे आश्वासन डॉ. सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिले. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘टेक्नीकल फेस्टिव्हल’ आणि ‘ऑटो एक्सपो’ सारखी मोठी प्रदर्शने भरवण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी जाहीर केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर अकोजवार आणि विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

