सिंधुदुर्गातील २० गावांमध्ये होणार ५० जलसंधारणाची कामे; पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून प्राधान्याने मंजुरी
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जल व मृदसंधारणाच्या कामांना त्यांनी प्राधान्याने मंजुरी दिली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० गावांमध्ये एकूण ५० कामे मंजूर करण्यात आली आहेत.
“ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता, लोकसहभागातून जलसंधारणाची एक मोठी चळवळ उभी करा,” असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले.
भूजल पातळी वाढवण्यावर आणि दुष्काळ मुक्तीवर भर!
बदलत्या हवामानामुळे पाऊस अनियमित झाला आहे, परिणामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. यावर मात करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५० कामांच्या माध्यमातून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवणे, ते जमिनीत मुरवणे आणि भूजल पातळी वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या शाश्वत उपाययोजनांमुळे स्थानिक पातळीवरील पाण्याचे स्रोत मजबूत होऊन जमिनीची धूप थांबण्यास मोठी मदत होईल.
माणसांसोबतच वन्यजीवांसाठीही पाण्याचा साठा वाढणार; जैवविविधतेचे होणार रक्षण
या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवी वस्तीसोबतच वन्यजीव संवर्धनासाठी जलसंधारणाचा मोठा उपयोग होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि ते मानवी वस्त्यांकडे स्थलांतर करतात.
हे रोखण्यासाठी वनक्षेत्रात पाण्याचे नवीन साठे निर्माण केले जातील. यामुळे वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाणी उपलब्ध होईल, पर्यायाने जैवविविधतेचे संवर्धन होऊन पर्यावरणीय संतुलन राखण्यास हातभार लागेल.
‘वनराई बंधारे’ उभारणीत नागरिकांनी उतरावे; पालकमंत्र्यांचे जाहीर आवाहन
पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या जनतेला आवाहन केले आहे की, वनविभागाच्या वतीने लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या ‘वनराई बंधारा’ उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रशासन आणि लोकसहभागाची सांगड घातली, तरच आपण पाणीटंचाईवर कायमची मात करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

