Latest:

मैत्री आणि विश्‍वासाचे नाते…

सिंधुदुर्ग

माशांच्या कचऱ्यातून कोट्यवधींची कमाई? आंध्र प्रदेश पॅटर्न आता सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे देशातील पहिल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे भव्य भूमिपूजन राज्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोकण आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देणारा ठरेल, तसेच स्थानिकांसाठी आर्थिक समृद्धीचा सुवर्णमार्ग उजळवेल, असा ठाम विश्वास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी २२.२४ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राचा कायापालट
सध्या देशात मत्स्य उत्पादनात आंध्र प्रदेश राज्य अव्वल स्थानी असून, तिथे वार्षिक ५५ लाख ३९ हजार टन मत्स्य उत्पादन होते. या व्यवसायातून आंध्र प्रदेशला तब्बल ७७,००० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळते. त्या तुलनेत महाराष्ट्र सध्या ७ लाख ४३ हजार टन उत्पादन घेत असून राज्याचे उत्पन्न १२,७७५ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातील मच्छिमारांना जागतिक स्पर्धेत उतरवण्यासाठी राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला ‘कृषीचा दर्जा’ दिला आहे. यामुळे आता मच्छिमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे जिल्हा बँक आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत सुलभपणे कर्ज आणि आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. तसेच, ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ देखील राज्यात प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे.

माशांच्या कचऱ्यातून होणार कोट्यवधींची कमाई
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धन (Value Addition) केले जाणार आहे. मासे आणि कोळंबी सोलताना निघणाऱ्या कचऱ्यापासून कॉस्मेटिक्स उद्योगात वापरले जाणारे अत्यंत मूल्यवान ‘कोलाजेन’ तयार करण्याचे कारखाने येथे उभे राहू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात याला मोठी मागणी आहे. आंध्र प्रदेशातील एका प्रकल्पाचे उदाहरण देताना मंत्री महोदयांनी सांगितले की, ३० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या एका कारखान्याला अमेरिकन कंपनीकडून तब्बल साडेचारशे कोटींची ऑफर मिळाली होती. याच धर्तीवर कोकणातील मत्स्य कचऱ्याचा सदुपयोग करून महिला बचत गट आणि स्थानिकांना मोठा आर्थिक नफा मिळवून दिला जाईल.

तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई किंवा इतर जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ येऊ नये, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. शास्त्रोक्त पद्धतीने जिताडा प्रकारातील १ कोटी मत्स्यबीज तयार करणारा हा प्रकल्प गरिबांना श्रीमंत करणारा ठरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पिंजरा व नैसर्गिक प्रक्रियेद्वारे मत्स्यबीज संवर्धन करून मत्स्य उत्पादक व बचत गटांची एक मजबूत साखळी तयार केली जाईल.

१२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे निर्देश
मंत्री नितेश राणे यांनी हा प्रकल्प अत्यंत वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील १२ महिन्यांच्या आत, म्हणजेच पुढील वर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, विभागीय वन अधिकारी कांचन पवार, शास्त्रज्ञ पंकज पाटील आणि सहायक आयुक्त सागर कुवसेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *