मैत्री आणि विश्‍वासाचे नाते…

ठाणे

ठामाच्या 44 व्या वर्धापन दिनी ठाणेकरांचा ‘सुवर्णक्षण’! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शेकडो गुणवंतांचा गौरव; 12 ‘ठाणे भूषण’, 100 हून अधिक ‘ठाणे गौरव’ आणि ‘गुणीजन’ पुरस्कारांचे वितरण

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास होत असताना त्यात ठाणेकरांचेही योगदान असते. ठाण्यातील नागरिक विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजोपयोगी काम करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी पुरस्कारांची गरज असते. हा सन्मान त्यांच्याबरोबर संपूर्ण शहराचाही असतो, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे महानगरपालिकेचा 44 वा वर्धापन दिन गुरुवारी (1 ऑक्टोबर) राम गणेश गडकरी रंगायतन येथे उत्साहात साजरा झाला. ठाणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणेकर नागरिकांना ठाणे भूषण, ठाणे गौरव, ठाणे गुणीजन, विशेष कला, विशेष क्रीडा आणि विशेष योगदान पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

व्यासपीठावर महापौर शर्मिलाताई पिंपळोलकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि अनेक ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. राठोड यांनी शिंदे यांचे स्वागत केले.

शिंदे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

आनंद दिघे आणि बाळासाहेबांचे स्मरण: शिंदे म्हणाले, “ठाणे महापालिका 44 वर्षे ठाण्याचा विकास करत आहे. आजच्या दिवशी बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. आज ठाण्यात होत असलेल्या विकासप्रकल्पांमागे दिघे साहेबांची प्रेरणा आहे.” मासुंदा तलावाचा गाळ दिघे साहेबांनी श्रमदानातून काढल्याची आठवणही त्यांनी सांगितली. “होणारी कामे कोणीही करू शकतो, न होणारे काम करणे हे कौशल्य आहे. माझी पद्धत ‘नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन’ अशी आहे,” असे ते म्हणाले.

पुरस्कारांचे महत्त्व: ठाणे महापालिका केवळ ‘गटार, वॉटर, मीटर’ इतक्यापुरती मर्यादित राहिली नाही, असे शिंदे म्हणाले. ठाणे वर्षा महापौर मॅरेथॉनचा उल्लेख करून ते म्हणाले, “चांगले काम केले की पाठीवर शाबासकीची थाप दिल्याने जबाबदारी वाढते, प्रेरणा मिळते आणि समाजात चांगले काम करणाऱ्यांची संख्या वाढते. अशा कार्यक्रमांची गरज आहे.”

विकासकामे:

  • रुंद रस्ते, मेट्रो आणि रिंग मेट्रोचे काम सुरू आहे. ठाणे-बोरिवली बोगद्याचे काम आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोस्टल रोड, एलिव्हेटेड मार्ग गायमुख ते फाउंटनपर्यंत (मीरा-भाईंदर, अहमदाबादकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत) जाणार आहे.
  • ठाण्यात 62 उद्याने आहेत. सेंट्रल पार्क उभारला आहे. तलावांचे शहर अशी ठाण्याची ओळख आहे.
  • कळवा, मुंब्रा, दिवा येथेही मेट्रोचा पुढील टप्पा होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाठपुरावा केला आहे. “श्रेयवादाच्या लढाईत आम्ही जात नाही. लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत,” असे शिंदे म्हणाले.

क्लस्टर योजना: वागळे इस्टेटमधील साईराज इमारत दुर्घटनेत 18 जण, तर लकी कंपाऊंडमध्ये 72 जण मृत्युमुखी पडल्याची आठवण करून शिंदे यांनी सांगितले की, धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर योजना सुरू करण्यासाठी त्यांनी ‘ठाणे बंद’ आणि आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला होता. आता वागळे इस्टेट, किसन नगर, रमाबाई आंबेडकर नगर येथे क्लस्टरच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत, तर गेल्या आठवड्यात सिद्धेश्वर येथे भूमिपूजन झाले. “ओपन स्पेस, गार्डन, मैदान, आरोग्य सेवा अशा 23 सुविधांसह पूर्ण नियोजित टाउनशिप हा देशातच नव्हे तर जगातील पहिला प्रयोग आहे,” असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सन्मानाचा उल्लेख: सूत्रसंचालकांनी सांगितले की, शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळ्यात विशेष सन्मान मिळाला. हाऊस ऑफ कॉमन्स येथे ‘ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ परिषदेत ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ आणि लंडनमधील महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ सन्मान प्रदान झाला.

हरित ठाणे, बांबू लागवड: स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि हरित ठाणे करण्याचे आवाहन करून शिंदे यांनी फळझाडांची लागवड आणि बांबू लागवडीवर भर देण्याची सूचना केली. सातारा जिल्ह्यात 15,000 एकरांवर बांबू लागवड झाल्याचे आणि मनरेगातून हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बांबूपासून इथेनॉल, विमानतळाचे फर्निचर आणि अधिक ऑक्सिजन मिळतो, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी आवाहन: मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळाचा उल्लेख करून शिंदे म्हणाले, “सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. बळीराजाचा पहिला अधिकार सरकारच्या तिजोरीवर आहे.” दुष्काळ तातडीने जाहीर केला असून दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. सण-उत्सव साधेपणाने साजरे करून वाचलेला पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बांधावर भेटलेल्या एका शेतकऱ्याचा ‘आत्महत्येशिवाय पर्याय नाही’ असा उद्गार आणि त्याला दिलेला दिलासा त्यांनी सांगितला. “कोणीही टोकाचे पाऊल उचलण्याची गरज नाही, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असे ते म्हणाले.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सूचना: ठाणे महापालिका निधीमध्ये क्रमांक एकवर आहे, पण निधीचा योग्य विनियोग, उत्तम दर्जा आणि वेळेत काम महत्त्वाचे आहे. नगरसेवकांनी ‘वॉर्ड हा आपला सातबारा’ असे समजू नये, कारण जनता जनार्दन निवडून देते. “लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत,” असे ते म्हणाले.

आरोग्य सेवा: कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया महापालिका आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने झाल्या. ज्युपिटर हॉस्पिटल आणि शासनाच्या मदतीने 9000 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया झाल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून त्यात किडनी, हृदय आणि लिव्हर ट्रान्सप्लांटचा समावेश केल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमातील एक उल्लेख: आयपीएस अधिकारी बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र रुद्रांश याला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याने त्याचे शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले.
पुस्तक प्रकाशन: सदाशिव टेटविलकर यांनी लिहिलेल्या, ठाणे महापालिकेचा 44 वर्षांचा इतिहास मांडणाऱ्या ‘नगरपालिका ते महानगरपालिका’ या पुस्तकाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले.

विशेष कला पुरस्कार

सोहळ्याची सुरुवात विशेष कला पुरस्कारांनी झाली.

  • दिनेश चोरगे: ‘मंगलगाणी दंगलगाणी’ या मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या संगीत-नृत्य कार्यक्रमाचे देश-विदेशात 1500 हून अधिक प्रयोग. भारतासह इंग्लंड, अमेरिका, दुबई, बेल्जियम येथेही यशस्वी प्रयोग झाले. ‘मराठी बाणा’ हा 70 एमएम स्वरूपातील भव्य कार्यक्रम, ‘ड्रीम गर्ल्स ऑफ बॉलिवूड’ (150 हून अधिक प्रयोग) आणि ‘आवाज की दुनिया’ (1600 हून अधिक प्रयोग) यातून त्यांनी रसिकांना आनंद दिला.
  • तेजश्री बलराज सावंत: भरतनाट्यम, लोकनृत्य आणि बॉलिवूड नृत्यातील नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका आणि प्रशिक्षिका. सुमारे 100 स्टेज कार्यक्रमांत सहभाग. महाराष्ट्र शासनाच्या इंडो-चायना युथ एक्सचेंज प्रोग्राममध्ये ‘बेस्ट फोक डान्सर’ सन्मान.
  • खुशी नितीन भानुशाली: बालवयापासून टीव्ही मालिका, वेब सिरीज आणि जाहिरातींत अभिनय. सारा अली खानसोबत कल्याण ज्वेलर्सची जाहिरात. शिक्षणही सुरू ठेवले आहे.
  • विनोद भालचंद्र पाटील: गेली 15 वर्षे ठाणे महापालिकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नृत्य दिग्दर्शन. ‘वन्स मोअर’ या स्वतःच्या मराठी चित्रपटाची निर्मिती. दत्तगुरू, विठोबा, खंडोबा आदी भूमिका साकारल्या.

ठाणे भूषण पुरस्कार

  • मुकुंद मराठे: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक, नट, कार्यक्रम निर्माता, तबलावादक, लेखक, खगोल-अंतराळ तज्ज्ञ. संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे सुपुत्र. नुकताच संगीत नाटक अकादमी पुरस्कार.
  • एकनाथ बिरवटकर: 40 वर्षे पत्रकारिता. ग्रामीण, आदिवासी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य. महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार.
  • सदाशिव कुलकर्णी: शिल्पकार. श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूलमध्ये 28 वर्षे कला शिक्षक आणि कला-हस्तकला विभागप्रमुख. मुंबई विमानतळ टर्मिनल 2 येथे ‘तेजरथ’ हे फायबर ग्लास म्युरल. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे आणि वृत्तपत्रांतील कला स्तंभ.
  • श्रीकांत वाड: आशियाई बॅडमिंटन संघटनेने 2004 मध्ये बॅडमिंटन विकास अधिकारी म्हणून नियुक्त केलेले एकमेव भारतीय. भारतासह अनेक देशांत प्रशिक्षण कार्यक्रम. सुमारे 38 जिल्हास्तरीय स्पर्धांचे आणि सुमारे 30 राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन. ठाणे शहराचे स्वच्छतादूत.
  • चंद्रशेखर ऊर्फ आप्पा महाशब्दे: ठाण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाचा ‘चालता-बोलता इतिहास’. बस स्टॉप रंगवण्यापासून जाहिरात कला, चित्ररथ, बॅनर, स्मृतिचित्र, रंगकाम, सुतारकाम, धातूकाम अशा क्षेत्रांत योगदान.
  • सीए संजीव ब्रह्मे: 154 वर्षे जुन्या बी. के. पटवर्धन अँड कंपनीत भागीदार. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या गुढीपाडवा स्वागतयात्रेचे कार्याध्यक्ष, ब्राह्मण सेवा संघ आणि मराठी ग्रंथसंग्रहालयाचे विश्वस्त, ‘गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशन’चे प्रवर्तक.
  • रामचंद्र चिमाजी जंगले: आदिवासी धर्म, संस्कृती, साहित्य आणि कला दर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि साहित्याचे जतन-संवर्धन.
  • देवदास बाबूराव चाळके: सामाजिक, राजकीय, कामगार आणि संघटनात्मक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व. ठाणे महापालिकेचे माजी परिवहन सभापती, शिक्षण मंडळ सदस्य, बँक ऑफ बडोदा लोकाधिकार समितीचे प्रमुख.
  • जयप्रकाश कोटवाणी: धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि शिंदे यांच्या माध्यमातून होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवात 20 हून अधिक वर्षे सक्रिय सहभाग. कोपरी-चेंदणी बंदर विसर्जनाच्या वेळी महाप्रसादाचे नियोजन, आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी उपक्रम.
  • सदाशिव पांडुरंग टेटविलकर: 55 वर्षांहून अधिक काळ इतिहास संशोधन, गड-किल्ले, लेणी, मंदिर आणि पुरातत्त्व अभ्यास. ठाणे-कोकणच्या इतिहासावर 500 हून अधिक लेख. कोकण इतिहास परिषदेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका.
  • अनिरुद्ध जोशी: पार्श्वगायक, गझल व भजन गायक, टीव्ही व रेडिओ कलाकार. 1200 हून अधिक मैफिली, 10 मराठी आणि एका हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन. इंडियन आयकॉनिक पर्सनॅलिटी, कोहिनूर ऑफ इंडिया, प्रियदर्शनी आदी पुरस्कार.
  • सुभाष प्रभाकर मालेगावकर: 50 वर्षे सांगीतिक कार्यक्रमांत वाद्यवादन. मँडोलिन वादनातील अग्रणी नाव, 11,000 हून अधिक कार्यक्रमांना साथ. (त्यांचा उद्या वाढदिवस असल्याचा उल्लेख सूत्रसंचालकांनी केला.)

ठाण्याचा ‘नेमबाज‘ रुद्रांश: आशियाई स्पर्धेत नेमबाजीत दोन सुवर्णपदके मिळवणारा रुद्रांश याला ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामूहिक छायाचित्राच्या वेळी तो उपमुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहिला. त्यावर सूत्रसंचालकांनी “याला म्हणतात नेमबाजी!” अशी दाद दिली.

ठाणे गौरव पुरस्कार

प्रमुख मानकरी:

  • करण सुहास देसाई: रस्ते पुनर्बांधणी क्षेत्रातील तज्ज्ञ.
  • गणेश दरेकर: प्रसिद्ध उद्योजक.
  • धनंजय महादेव पष्टे: शिक्षण, संशोधन, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व.
  • डॉ. तृप्ती दीपक डोंगरे-चांगलानी: बालहृदयरोग तज्ज्ञ. लहान मुलांच्या वैद्यकीय उपचारांसाठी सक्रिय.
  • मोहन लक्ष्मण पवार: आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट व नाट्य कलावंत. 45 वर्षे नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत.
  • प्रकाश गंगाराम पोळ: ज्येष्ठ कवी, साहित्यिक, बालसाहित्यकार. त्यांच्या वतीने शुभांगी पोळ यांनी पुरस्कार स्वीकारला.
  • डॉ. भाग्यश्री कौस्तुभ खरवंडीकर: आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विज्ञान-गणिताचे मोफत ज्ञानदान, शैक्षणिक मोबाइल व्हॅन, संस्कार वर्ग, व्यसनमुक्ती जनजागृती.
  • कैलास म्हापदी: ज्येष्ठ पत्रकार, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे संस्थापक अध्यक्ष. ‘दैनिक जनमुद्रा’ (2001) चे संस्थापक.
  • विजयलक्ष्मी कन्न: गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणाऱ्या समाजसेविका.
  • सुदाम विठोबा घुगे: कामगार युनियन क्षेत्रात 35 वर्षे सक्रिय योगदान.
  • जनार्दन गुणाजी कोंडविलकर: आश्रम मित्र मंडळाचे अध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे मानकरी.
  • शितल निकम
  • संध्या शास्त्री: रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट आणि इनरव्हील क्लबच्या माध्यमातून 20 वर्षे सामाजिक कार्य.
  • वासंती विवेक वर्तक: शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, प्रसारमाध्यम आणि सामाजिक क्षेत्रात योगदान. 38 वर्षे सह्याद्री वाहिनीवर वृत्तनिवेदिका व सूत्रसंचालिका.
  • तालमणी पं. मुकुंदराज देव: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक, संगीतकार, लेखक, शिक्षक. त्यांच्या वतीने वडील श्रीराम देव यांनी पुरस्कार स्वीकारला.
  • रमेश लक्ष्मण चांदणे: 20 वर्षे हिंदी-मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांत अभिनय.
  • पद्माकर शिरवाडकर: नऊ मराठी पुस्तकांचे लेखक. सध्या खानदेश कन्या बहिणाबाई यांच्या चरित्रावर लेखन.
  • सूरमणी पं. विवेक सोनार: जगप्रसिद्ध बासरीवादक. पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य. 14 देशांत सादरीकरण, एकाच वेळी अनेक देशांतील 100 हून अधिक बासरीवादकांची ‘फ्लुइड सिम्फनी’ सादर करण्याचा विक्रम.
  • सविता राणे: लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचे कार्य. ‘विकास भारत अवॉर्ड 2026’ ने सन्मानित.
  • राजेश मारुती जाधव: ब्रह्मांड-आझादनगर प्रवासी संघाचे अध्यक्ष. ‘ब्रह्मांड कट्टा’च्या माध्यमातून शून्य घनकचरा मोहीम आणि संगणक प्रशिक्षण.
  • प्रिया मदन सावंत: महाराष्ट्र शासनाच्या डीव्हीईटी अंतर्गत 400 आयटीआयमधील एक लाख विद्यार्थ्यांना आणि 8000 हून अधिक कार्यशाळांद्वारे तीन लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मार्गदर्शन.
  • रमेश दळवी: ज्येष्ठ नागरिक.
  • मंदार वामन कोळी: क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक योगदान. 2010 ते 2022 महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या पंच मंडळात, 2022 ते 26 ठाणे जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनचे सचिव.
  • संतोष सहदेव धुरी: मुक्त पत्रकार. सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, क्रीडा, राजकीय आणि पर्यावरण विषयांच्या बातम्या छापील, साप्ताहिक आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून पोहोचवतात. तरुणांना रोजगारासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात योगदान.
  • शिवाजी नागुलकर: 30 वर्षांहून अधिक काळ शिल्पकार.
  • ज्योती कोटक: उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटीच्या माजी अध्यक्ष. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी कार्य.
  • नासिर शेख: पुणे विद्यापीठातून पर्सनल मॅनेजमेंटचे पदव्युत्तर शिक्षण, हार्वर्ड आणि इनसीड येथे एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्करुग्णांना मोफत उपचार.
  • डॉ. सुनीता संजीव जैन: हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये 22 वर्षे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट. त्यांच्या प्रकल्पांमुळे महिलांचा पाण्यासाठीचा दैनंदिन संघर्ष कमी झाला.
  • सुरेश केशव मोरे: कामगार रुग्णालय, मुलुंड येथे वरिष्ठ लिपिक म्हणून 35 वर्षे सेवा करून निवृत्त. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात योगदान.
  • कीर्ती सतीश आगाशी: इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा, तीन दशकांहून अधिक अध्यापन, संगीत लेखन आणि सांस्कृतिक कार्य.
  • सागर नेहे: “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश देणारे कार्यकर्ते.
  • महादेव जगताप: चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक, ठाणे महापालिकेत विविध पदे भूषवली.
  • शोभाताई वैराळ: कचरावेचक महिलांच्या आरोग्य, सामाजिक व आर्थिक प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा.
  • बी. के. हर्षा दीदी: वयाच्या 18 व्या वर्षापासून ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात, 34 वर्षे आध्यात्मिक सेवा. व्यसनाधीनता आणि नकारात्मक प्रवृत्तींपासून अनेकांना दूर केले.
  • डॉ. अनमोल प्रकाश सोनावणे: प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट. हृदयाच्या झडपांवरील अत्याधुनिक उपचारांत तज्ज्ञ.
  • विनोद मनोहर पाटील: सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्य, विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड.
  • हर्षाली किशोर शिंदे: महालक्ष्मी बचत गट स्थापन करून राबोडी येथील महिलांना फराळ व पोळी-भाजी व्यवसायातून स्वावलंबी केले.
  • अमोल दत्ताराम जामदार: 35 वर्षांहून अधिक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य. युवक कल्याण समिती ट्रस्ट आणि अमोल जामदार फाउंडेशनचे अध्यक्ष.
  • मीनाक्षी वसंत माळवदे: तालुका व जिल्हा पातळीवर अॅथलेटिक्समध्ये सहभाग, अनेक ट्रॅक रेकॉर्ड्स.
  • किसन गणपत आरबुज: वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ उपक्रम.
  • जयराम पुजारी: अन्नदान, शोभायात्रा आणि प्रतिभा पुरस्कार उपक्रम.
  • अनुजा टिपणीस: 12 वर्षे समाजसेवा.
  • सुधीर जनार्दन थोरात: वास्तुकला, इंटिरियर डिझाइन आणि समाजसेवा क्षेत्रात तीन दशकांहून अधिक कार्य.
  • भारती सहस्रबुद्धे: ‘आनंदाचं पान’ पुस्तकावर आधारित दर रविवारच्या कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि लेखक संवाद.
  • मीना दिलीप कवितके: धनगर प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व पुण्यतिथीला प्रभातफेरी.
  • संजय सोनी: 35 वर्षे समाजोपयोगी कार्य.
  • रोहिणी सुहास दिवाण: पत्रकारिता, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र (“जिथे बातमी तिथे रोहिणी”).
  • कविराज चव्हाण: घरकामगार, बांधकाम कामगारांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मोफत शस्त्रक्रियांसाठी मदत.
  • भरत रामचंद्र पाटील: व्यायाम, क्रीडा, युवक प्रशिक्षण आणि साहसी उपक्रम.
  • डॉ. अक्षता सदानंद पंडित: शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, पर्यावरण आणि समाजसेवा.
  • शिवाजी शंकर अहिरे: ठाणे महापालिकेच्या स्पर्धांत अॅथलेटिक्स ट्रॅक ऑफिशियल, ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशनमध्ये विविध जबाबदाऱ्या.
  • डॉ. सुनील सज्जनराव घोडके: महाराष्ट्र टाइम्स, दिनमान, सकाळ आणि साहित्यिक मासिकांतून 150 हून अधिक सामाजिक-राजकीय लेख.
  • हेमंत प्रभाकर अलवे: ‘आद्य क्रांतिवीर संस्था’ स्थापन करून शाळांमधून स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा पोहोचवल्या.
  • स्वप्नील मारुती गायकर: विविध शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व. 6800 विद्यार्थी, 2010 शिक्षक, आतापर्यंत 28,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.
  • संजय जयराम भालेराव: मुंबई संध्या, जनमुद्रा, जनादेश, सम्राट, वृत्तमानस, कोकण सकाळ येथे काम. सध्या दैनिक ‘मुंबई चौफेर’चे ठाणे प्रतिनिधी.
  • गणेश चंद्रकांत भोईटे: साप्ताहिक ‘एम्प्लॉयमेंट फ्रेंड’चे संपादक, दैनिक महाराष्ट्र सम्राटचे कार्यकारी संपादक. रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रातून अनेकांना मोफत करिअर मार्गदर्शन.
  • सैयद अब्बास अली कासम अली: 30 वर्षे सामाजिक-शैक्षणिक कार्य. वर्कमन युनियनचे अध्यक्ष, अंजुमने खानदेश ट्रस्ट राबोडीचे अध्यक्ष.
  • अन्सारी मोहम्मद आरिफ मोहम्मद शरीफ: 35 वर्षे शिक्षण क्षेत्रात. मदरसा मदिनतुल उलूम, राबोडी येथे इस्लामिक शिक्षक.
  • जितेंद्र करंजेकर आणि आशू करंजेकर: अनाथ, गरजू आणि कर्करुग्ण मुलांसाठी मनोरंजन कार्यक्रम, कोरोना काळातील जनजागृती.
  • राजेश तुळशीराम कदम: शेठ बबनराव माध्यमिक पडवळ विद्यालयात 35 वर्षे सेवा.
  • महेश खुशलानी: सात दशकांहून अधिक काळ दर्जेदार सेवा. वृद्धाश्रमांना किराणा आणि अनाथाश्रमांना धान्य पुरवठा.
  • ओमकार अशोक पाटील: ग्राफिक डिझायनर आणि प्रिंटिंग व्यावसायिक. बॅनर शॉपमधून सुरुवात करून स्वतःचे नाव घडवले.
  • दिवाकर अनंत गोळपकर: ज्येष्ठ पत्रकार. सन्मित्र, ठाणे वैभव, जनमत, लोकमत, पुण्यनगरी, दैनिक सागर, महाराष्ट्र सम्राट येथे स्थानिक समस्यांना वाचा फोडली.
  • प्रदीप बलदेव गोयंका: ‘ठाणे नागरिक’ या हिंदी साप्ताहिकाच्या माध्यमातून जनजागृती.
  • शिवनाथ नारायण गायकवाड: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव.
  • तानाजी पवार: गरजू रुग्णांसाठी योजना, शिबिरे आणि वारीदरम्यान वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा.
  • संदीप मधुकर धायगुडे: क्रीडा प्रशिक्षक, टेनिस खेळाडू आणि मार्गदर्शक.
  • संभाजी राजाराम शेळके: विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन.
  • अजिता कुमठेकर: 40 वर्षांहून अधिक अध्यापन.
  • विकास वासुदेव मिराशी: पत्रकारिता आणि निवडणूक व्यवस्थापन क्षेत्र.
  • यमुना म्हात्रे: कोरोना महामारीच्या काळात अन्नाची पाकिटे वाटून कुटुंबांना आधार दिला.
  • वाल्मिक मांढरे: सेवानिवृत्त पीएसआय, राष्ट्रपती पदक सन्मानित.
  • संदीप सयाजी सुर्वे: कराटे प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय पदक विजेते, परीक्षक आणि अकादमी संस्थापक. 25 वर्षांहून अधिक योगदान.
  • मनोज बलवानी: ठाणे जिल्ह्यातील सिंधी समाजबांधवांसाठी कार्य, विशेषतः निधनानंतर अंत्यसंस्कारापासून सर्व विधी पार पडेपर्यंत निःस्वार्थ सेवा.
  • शिल्पा रघुनाथ अपराध: वयाच्या 75 व्या वर्षीही रांगोळीच्या माध्यमातून मंगलमय कार्यक्रम अधिक मंगलमय करतात.
  • अमित उपाध्याय: वंचित घटकांच्या विकासासाठी आणि मानवतावादी सेवेसाठी समर्पित.
  • राहुल: 20 वर्षे पत्रकारिता, कोरोना योद्धा पुरस्कार. प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त म्हणून ठाण्याला पहिल्यांदा हा मान.
  • प्रज्ञा मनीष पंडित: निरूपणातून अध्यात्म, पुराण आणि स्तोत्रे सहजतेने पोहोचवतात. जोशी-बेडेकर महाविद्यालयात प्राध्यापक.
  • सोनल कदरेकर: नेत्रतपासणी शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि अपंगांना मोफत जयपूर फूट.
  • सीताराम कोंडीबा न्यायनिर्गुणे: सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी. 55 वर्षे टेनिस खेळत आहेत. लॉन टेनिसमध्ये 75 हून अधिक वयोगटात भारतातर्फे एकेरी व दुहेरीत सुवर्णपदके.
  • डॉ. निलेश विनायक जयवंत: दंत वैद्यकीय सेवा, रोटरीच्या माध्यमातून समाजसेवा, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन.
  • काश्मिरा त्रिवेदी: भरतनाट्यम क्षेत्रात अनेक विद्यार्थिनी घडवल्या. ठाण्याच्या प्रतिष्ठित ‘उपवन फेस्टिव्हल’मधील नृत्य मंचाची जबाबदारी सांभाळतात.

ठाणे गुणीजन पुरस्कार (पहिला टप्पा)

  • प्रदीपकुमार अनंत शिंदे: सेवानिवृत्त सैनिक आणि सेवानिवृत्त वन अधिकारी. वनसंरक्षण, वनसंवर्धन आणि सामाजिक कार्याबद्दल राज्य शासन व जिल्हाधिकाऱ्यांकडून सुवर्णपदके.
  • साधना चंद्रशेखर ठाकूर: साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान. कैलासवासी राजा राजवाडे वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार, 17 व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनात सहभाग, राज्यस्तरीय भारत ज्योती कलारत्न नारी गौरव पुरस्कार.
  • रामदास खरे: ज्येष्ठ साहित्यिक, कवी, चित्रकार. अनेक विषयांवर पुस्तके, चित्रलेखन. आकाशवाणी मुंबई आणि रेडिओ विश्वास नाशिक येथे कविता व कथावाचन.
  • अर्चना कैलास पाटील: विद्या प्रसारक संस्थेच्या बाळकुम विद्यालयाच्या बालवाडी विभाग मुख्याध्यापिका. 28 वर्षे विद्यादान, उत्तम निवेदिका.
  • जनार्दन दामोदर मडवी: सामाजिक कार्यकर्ते. कोविड-19 काळात गरजूंना सहकार्य, विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळात 25 वर्षे सक्रिय सहभाग, कचरनाथ महाराज स्वामी यांचे मंदिर स्थापन करून समाजप्रबोधन.
  • यतीन मधुकर ठाकूर: नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. भारत सरकारच्या अणुविषयक कार्यक्रमांतर्गत देशभरातील महाविद्यालयीन तरुणांसाठी जनजागृती. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील नाटकाची निर्मिती आणि त्यात सावरकरांची भूमिका.
  • डॉ. भरतला राघवेंद्र पारितोष राव: ऑर्थोडॉन्टिक्स आणि डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्समधील एमडीएस तज्ज्ञ दंतचिकित्सक. त्यांच्या वतीने त्यांच्या वडिलांनी पुरस्कार स्वीकारला.
  • डॉ. हर्ष नामदेव भोर: शिक्षण, संशोधन आणि सामाजिक परिवर्तन क्षेत्रातील कार्य. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि सी-डॅक पुणे यांच्याकडून हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग मास्टर ट्रेनर म्हणून निवड, 1000 हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन.
  • सुकुमार साखरदांडे: सामाजिक सेवा, आरोग्य सेवा, बालकल्याण, युवक व पालक मार्गदर्शन. कर्करोगग्रस्त मुलांसाठी अनेक वर्षे उपक्रम, विनामूल्य ऑनलाइन संगीत कार्यक्रम.
  • डॉ. माधुरी साखरदांडे: गेली 27 वर्षे स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ. मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, विनामूल्य ऑनलाइन संगीत कार्यक्रम.
  • डॉ. दादाभाऊ साहेबराव मस्के: अग्निसुरक्षा क्षेत्रात 20 वर्षांची सेवा. पवार नगर, ठाणे येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘त्रिमूर्ती क्लासेस’ या मोफत शिकवणी वर्गाची स्थापना.

ठाणे गुणीजन पुरस्कार (दुसरा टप्पा)

कला, साहित्य, शिक्षण: विद्या निकम (साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्र), प्रा. डॉ. दीपक साबळे (28 वर्षे अध्यापन, अर्थशास्त्राचे अभ्यासक, प्राचार्य), रेवा रवींद्र समेळ (गरजू व ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप), आदिती विणकरे (विविध कलागुणांत प्रशिक्षण), मोहम्मद उस्मान गनी शेखानी (शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक, कवी, लेखक, प्रेरणादायी वक्ते; ‘जिंदगी’, ‘कविता’, ‘सपनों का आसमान’ हे काव्यसंग्रह), संदेश यशवंत मोरे (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात समन्वयक), प्रेमकुमार तिलकधारी (शैक्षणिक क्षेत्र), अश्विनी अनंत सुर्वे (लुप्त होत चाललेल्या मराठी मोडी लिपीचा व्यासंग), अमोल मुरलीधर नाले (मेकॅनिकल इंजिनिअर, 950 हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन).

आरोग्य क्षेत्र: डॉ. अशोक यशवंत येवले (1995 पासून आयुर्वेदाचार्य), डॉ. दीपक गुलाबचंद शर्मा (रुग्णसेवा, मृत्यू दाखल्यासाठी मदत), डॉ. तुषार पाटील (20 वर्षे वैद्यकीय सेवा), डॉ. नेहा कोल्हे, डॉ. उत्तम भोर (सांगली-कोल्हापूर महापूर आणि आपत्तींत वैद्यकीय शिबिरे, पंढरपूर वारीत शिबिर, पालघर-वाडा-जव्हार भागात आरोग्य शिबिरे), डॉ. ज्योती भोजणे (पोतदार रुग्णालयात सर्जिकल रजिस्ट्रार, वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशनच्या खजिनदार), डॉ. हितेश पाटील (येऊर, वाडा, मोखाडा, जव्हार, नंदुरबार-सातपुडा येथे आरोग्य शिबिरे), डॉ. विष्णुदास तुळशीदास मेहता, डॉ. तृप्ती सोनावणे, विजय विष्णू जोशी (आरोग्य सेवा), भरत ज्ञानेश्वर (आरोग्य मित्र), राजीव कोंडाजी शिंदे (वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, मानवता केमिस्ट आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूंसाठी कार्य), कुंदा अशोक धनवटे (आरोग्य क्षेत्र).

क्रीडा: अद्वैत आशय वायंगणकर (आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय पदक विजेते), आकांक्षा गावडे (खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 4×400 मीटर रिले, 400 मीटरमध्ये सुवर्णपदक, 200 मीटरमध्ये कांस्यपदक).

संगीत, नाट्य, संस्कृती: नागेश कोळी (सॅक्सोफोन वादक), किरण वेहेले (कीबोर्ड वादक), भोजराम एम. गव्हाणकर (मराठी-हिंदी नाटकांतील अभिनेते), दीपक पांडुरंग सावंत (43 वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात, यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिराचे व्यवस्थापक), रुजुता देशपांडे (‘मिसेस टॉप ऑफ द वर्ल्ड’ सन्मान).

अध्यात्म आणि धार्मिक कार्य: नारायण देवराम पठारे (दररोज हरिपाठ, कार्तिक महिन्यात काकडा भजन, श्रावणात सार्थ ग्रंथवाचन), महादू जोमा पाटील (1970 पासून गायन-भजन, वारकरी संप्रदायासाठी कार्य), प्रमिला श्रीधर थोरात (कीर्तन, प्रवचन, समाजप्रबोधन), कमल कुमार मिश्रा (रामलीला शोभायात्रा, रक्तदान शिबिर, दर शनिवारी सुंदरकांड), आशा विलास इळवे (30 वर्षांपासून सत्संग सेवा), अमोद नरहरी जोशी (आध्यात्मिक कार्य, अन्नदान), सुवर्णा महेंद्र पालेकर (योग प्रशिक्षण), कल्याणी काळे (योग शिक्षिका).

सामाजिक कार्य: विजय सावंत, अनिल नानू, गणेश राजाराम मांजरेकर (36 वर्षे; प्रवासी महासंघाच्या माध्यमातून कार्य), अविनाश म्हात्रे, अविनाश काशिनाथ म्हात्रे, सागर वसंत जोशी, सागर जोशी, ॲड. विनय कुमार सिंग (शिवशांती प्रतिष्ठान), अमरदेव सिंग, बांगी अब्दुल सलाम शेख अली (35 वर्षे सामाजिक-शैक्षणिक कार्य), खान मोहम्मद नईम मोहम्मद शफी, कृतिका बिर्जे, विजय रावजी सावंत, रणवीरसिंग बाबूसिंग राजपूत, सदानंद गंगाबाई केशव राणे, विजय कृष्णा मोहिते, मिथुल नीलकंठ पाटील आणि कुणाल पाटील (कोपरीतील गरजू विद्यार्थ्यांना मदत, शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा), प्रकाश निवृत्ती (36 वर्षे विक्रीकर विभागात सेवा; प्राथमिक शाळेतील मुलींसाठी सॅनिटरी मशीन आणि वॉटर प्युरिफायर), राम इंदलकर (सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक कार्य), राजेश मिश्रा (विवेकानंद एज्युकेअर), नथुराम गोविंद जाधव, भास्कर संदीपान काशीद, बाळू कृष्णा पाटील, पांडुरंग रावजी सनप, गोविंद पाटील, संगीता शिवाजी घुगे, अनिल कुमार काशिनाथ मटकरी, गृहिता सचिन विचारे, मोहन गोंधळे, बबन तुकाराम चव्हाण, दादासाहेब हरणाबाई भाऊ निकम, संजय यशवंत ठाकूर (औषध कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक, गरजूंना मोफत औषधपुरवठा), बबन जयसिंग मोरे (शेतकरी कुटुंबातून आलेले, राजकीय-सामाजिक क्षेत्रात कामगिरी), भरत नांगरे (ठाणे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी; सातव्या वेतन आयोगासाठी शांततापूर्ण पाठपुरावा), दीपक चंदानी, नेहा प्रकाश लखानी, शुभदा विद्वांस, चंद्रशेखर मधुसूदन पुरोहित (वृद्धाश्रम चालवतात, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विश्वस्त), हिरासिंग स्वरण सिंग (40 वर्षे सामाजिक कार्यकर्ते), रवी शशिकांत परब (आई अमृत फाउंडेशनच्या माध्यमातून 15 वर्षे पहिली ते दहावीतील 500 आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी कार्य), नरेश पुखराज चौधरी, गणेश मुकादम, संध्या सामंत सावंत, संगीता गायकवाड, निशा फुलसुंदर.

इतर: ॲड. गजानन महादेव सावरगावे (मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी-फौजदारी खटले, पश्चिम महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या पॅनलवर वकील), ॲड. मनोज वैद्य (‘लोकसत्ता’मध्ये शेकडो लेख, ‘शहराचा कायापालट’ पुस्तकाचे लेखक, ‘आपला महाराष्ट्र’ डिजिटल न्यूज चॅनलचे संपादक, क्रेडाईकडून गृहनिर्माण पुरस्कार), सुहास मारुती विंचू (भारतीय नौदलात 34 वर्षे देशसेवा, दारूगोळा तपासणी अधिकारी).

आदित्य दिनकर पाटील: 2009 पासून वन्यजीव बचाव कार्य आणि जनजागृती.

विशेष क्रीडा पुरस्कार

गेल्या चार वर्षांत प्रादेशिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा विशेष क्रीडा पुरस्काराने गौरव करण्यात आला.

अनुष्का अंकुश चव्हाण, सोहम सुनील महाजन, मानव शंकर जाबर, कौशिक विजय राजगुरू, किशोर काशिनाथ म्हात्रे, प्रिया चिराग शाह, प्रणव राजे, अरिहा पंगभम, अली शेख, अर्पिता गावडे, राशी स्वप्नील गायकर, पर्ल मनीष बिरवटकर, आर्या अनूप देवस्थळी, धृती नितीन कोळी, आयुष प्रवीण तावडे, अनन्या कोठारे, अवनी नितेश कदम, चिन्मय गुरव, माही सचिन जांबळे, श्रुती सचिन जांबळे, समीपता गणेश वाभवळ, सिद्धेश रामेश्वरराव मुपीनेटी, शितल खरटमल, रुद्र विकास निसार, नक्ष विकास निसार, ओजस राजेश मोरे, रेयांश दीपक खामकर, समिधा संतोष मोरे, आरित झिंदाल, अथर्व नरेंद्र ठाकरे, आयुषी कैलास आखाडे, किम्या अमलेश कारले, आर्या नितेश कदम, स्वरांगी शरद नार्वेकर, शरयू निलेश पाटील, अनुश्री स्वप्नील बापट, ओवी कुलभूषण, सर मुकादम, स्वरदा मंगेश बापर्डेकर, केतकी कुमार ढमाले, किमया केदार गायकवाड, आरुष, दीप्ती मोरे, शौर्या अंबुरे, मधुरा महेश देवळे आणि सृष्टी हरेश राणे.

विशेष योगदान पुरस्कार: काळू गाडेकर कुटुंबाला आदरांजली

गावदेवी भाजी मार्केटच्या भीषण आगीत शहीद झालेले काळू गाडेकर यांच्या कुटुंबीयांना विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून कुटुंबाप्रती कृतज्ञता आणि आदरांजली व्यक्त करण्यात आली. “आमची कृतज्ञता आणि सहवेदना कुटुंबासोबत कायम राहील. त्यांना शहीद दर्जा मिळावा यासाठी महापालिकेतर्फे राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे आणि योग्य वेळी त्याची दखल घेतली जाईल,” असे सूत्रसंचालकांनी जाहीर केले. “ठाणेकर या कुटुंबाच्या ऋणात राहणे पसंत करतात,” असेही ते म्हणाले.

समारोप

सन्मानचिन्हे व्यासपीठावर प्रदान करण्यात आली, तर सन्मानपत्रे महापौर कार्यालयातून दिली जातील, अशी घोषणा झाली. सर्व पुरस्कारप्राप्तांचे सामूहिक छायाचित्र काढण्यात आले आणि महापालिकेतर्फे छायाचित्रणाची व्यवस्था असल्याने सर्वांना फोटो मिळतील, असे सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी वर्षानुवर्षे महापालिकेचे सूत्रसंचालन करणारे राजेंद्र पाटणकर यांचा खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महापौर कार्यालय, जनसंपर्क (पीआरओ) विभागातील प्राची डिंगणकर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचाही महापौर, खासदार, सभागृह नेते हनुमंतराव जगदाळे आणि सचिव रामभाऊ रेपाळे यांच्या हस्ते सत्कार झाला.

सर्व पुरस्कारप्राप्तांचे आभार मानून “तुमच्या कार्याची दखल प्रत्येक वेळी घेतली जाईल,” असा विश्वास व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *