“आई राजा उदो उदो” तुळजापुरात भक्तिमय वातावरणात घटस्थापना; जाणून घ्या कुलस्वामिनीचा इतिहास, वास्तुकला आणि धार्मिक परंपरा
तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रविवारी (ता. ११) दुपारी ठीक बारा वाजता घटस्थापना करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कीर्तीकिरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यासोबतच आई भवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला अधिकृत सुरुवात झाली असून संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तांच्या गर्दीने आणि जयघोषाने दुमदुमून गेली आहे.
पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना आणि विशेष पूजा
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिवसभर देवीचे मुख्य सिंहासन आणि गाभारा स्वच्छ करण्याचे काम करण्यात आले होते. ९ दिवसांची मंचकी निद्रा संपवून रविवारी पहाटेच तुळजाभवानी मातेची मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पहाटे अभिषेक आणि धुपारती झाली. सकाळी सहा वाजता मातेचे नित्योपचार अभिषेक आणि पारंपारिक सिंहासन पूजा करण्यात आली. दुपारी मुख्य घटस्थापनेनंतर ब्राह्मणांना वर्णी देण्यात आली असून, आता नऊ दिवस मंदिरात अखंड धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
भवानी ज्योतींचे आगमन आणि प्रशासनाची जय्यत तयारी
शनिवारी दिवसभर महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतून आलेल्या भवानी ज्योत धारक भाविकांची शहरात लक्षणीय गर्दी होती. प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेसाठी शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी घाटशीळ रस्त्यावरील तात्पुरत्या दर्शन मंडपाचे काम पूर्ण करण्यात आले असून, भक्तांना याच मार्गाने मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
श्री तुळजाभवानी माता: इतिहास, वास्तुकला व धार्मिक परंपरा प्राचीन ऐतिहासिक व आध्यात्मिक संदर्भ
श्री क्षेत्र तुळजापूर हे सृजनाची अधिष्ठात्री देवता असलेल्या आई जगदंबेचे आद्य पीठ आहे. महर्षी मार्कंडेय पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे, महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने येथे अवतार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या या भवानी मातेवर कोट्यवधी भाविकांची अगाध श्रद्धा आहे.
मंदिराची हेमाडपंथी वास्तुकला
तुळजाभवानी मंदिराचे दगडी बांधकाम आणि स्थापत्य शैली प्रामुख्याने १२ व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी परंपरेशी जोडलेली आहे. मंदिराच्या रचनेवर चालुक्य आणि शिलाहार राजवटींचा प्रभाव दिसून येतो.
मुख्य आकर्षणे
मंदिराचे भव्य महाद्वार, स्वयंभू मूर्ती असलेला पवित्र गाभारा, विस्तीर्ण सभामंडप, नक्षीदार दगडी दीपमाळा आणि परिसरातील पवित्र कल्लोळ व गोमुख तीर्थ ही जलकुंड या वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत.
पूजा व वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरा
मंदिरातील शेकडो वर्षांची परंपरा आजही जपली जाते. यामध्ये नवरात्रीपूर्वी होणारी ‘मंचकी निद्रा’ (देवीचा विश्राम काळ) अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शारदीय नवरात्रोत्सवाव्यतिरिक्त येथे कोजागिरी पौर्णिमा, शाकंभरी नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला भव्य उत्सव साजरे होतात. आई भवानीची ही भक्ती भक्तांना शक्ती, धैर्य आणि सदाचाराची प्रेरणा देते.

